वेळू-नसरापूर गटात मूळ ओबीसी की प्रस्थापित कुणबी ? मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
नसरापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भोर तालुक्यातील वेळू-नसरापूर गटात राजकीय समीकरणांचे तारे पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. या गटासाठी इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण घोषित झाल्याने स्थानिक पातळीवर उमेदवारीच्या हालचालींना वेग आला आहे.या मतदारसंघात मूळ ओबीसी की प्रस्थापित कुणबी या दोन प्रवर्गांतील उमेदवारांपैकी कोणाला समर्थन मिळणार हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दिवाळी नंतर प्रचार युद्धाची पहिली झळाळी दिसू लागली आहे. इच्छुक उमेदवारांनी मिठाई, साडी वाटप, सामाजिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून जनता संपर्क मोहिमांना सुरुवात केली आहे. तरीही मतदारसंघात अठरापगड जातींपैकी काही मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, मागील काही निवडणुकांपासून प्रस्थापित समाजांकडे प्रतिनिधित्व झुकल्याची भावना या समाजात दृढ झाली आहे. शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार आरक्षणाच्या अंमलबजावणीतील बदलांमुळे ‘खरा लाभ कोणाला?’ या प्रश्नावर समाजांमध्ये चर्चा रंगताना दिसते.
परंपरागत अठरापगड समाजाचे नेते सांगतात की प्रस्थापित ओबीसी गटांकडून त्यांच्या समस्या आणि विकासकामांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे यावेळी मूळ ओबीसी प्रवर्गातून उमेदवार उभा राहिल्यास त्याला अपेक्षित जनसमर्थन मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, प्रस्थापित कुणबी समाजाचा संघटनात्मक पाया मजबूत असल्याने त्यांचे उमेदवार निवडणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वेळू-नसरापूर गटात विविध समाजघटकांची लक्षणीय उपस्थिती असून या वेळी मुख्य लढत मूळ ओबीसी विरुद्ध प्रस्थापित कुणबी अशा दोन गटांमध्ये होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी कार्यकर्त्यांच्या सभा, ग्रामभेटी व मतदार संपर्क मोहिमांना वेग दिला आहे. निवडणूक जवळ येत असताना वैयक्तिक संबंध, सामाजिक भेटीगाठी आणि विविध प्रलोभनांची स्पर्धा तीव्र बनत आहे. त्यामुळे या गटात कोणता समाज निर्णायक ठरणार आणि मतदारांचा कल कोणाकडे झुकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




