भोर तालुक्यातील किवत येथे मराठी बाल साहित्य संमेलनात लहानग्यांचा जल्लोष
वसंत मोरे
किवत, ४ ऑक्टोबर २०२५ – बालसाहित्याची गोडी लहानग्यांच्या मनात खोलवर रुजावी, विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा व भावी पिढीतील साहित्यिक घडावेत या हेतूने , शिक्षण विभाग पंचायत समिती भोर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी बाल साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किवत येथे आयोजित या मराठी बालसाहित्य संमेलनात बारे बुद्रूक केंद्रातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला
या संमेलनाचे उद्घाटन किवत गावाचे सरपंच श्री तानाजी चंदनशिव व महाराष्ट्र पोलीस श्री अक्षय भंडलकर यांच्या हस्ते झाले.
या मराठी बालसाहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन, सुंदर हस्ताक्षर, स्वरचित काव्यवाचन, कथाकथन, स्वरचित कथालेखन, वक्तृत्व इ स्पर्धांचे विविध गटांमध्ये आयोजन करण्यात आले होते. विविध तज्ञ परीक्षकांमार्फत या मुलांच्या साहित्यकृतीचे परीक्षण करून त्यातील उत्तम साहित्य कृती यांना क्रमांक देण्यात आले व विजेत्या विद्यार्थ्यांना तालुका पातळीवरील साहित्य संमेलनासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
किवत शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ आशा कवितके मॅडम व म्हाळवडी शाळेतील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री गणेश बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांना बालसाहित्याचे महत्त्व पटवून दिले आणि पुस्तके म्हणजे आपल्या आयुष्यातले खरे मित्र असल्याचे सांगितले, शाळेतील मुलांच्या हस्ते तयार करण्यात आलेली ‘बाल साहित्य प्रदर्शनी’ हे संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले.उपक्रमामुळे बालसाहित्याच्या क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल.
या साहित्य संमेलनात किवत गावचे सरपंच तानाजी चंदनशिव, महाराष्ट्र पोलीस अक्षय भंडलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज चंदनशिव, सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक वसंत मोरे व बारे बुद्रुक केंद्रातील 17 शाळेतील विद्यार्थी,शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.