कौतुकास्पद ! भोर तालुक्यातील लेक झाली ‘एअर होस्टेस’ !! आई-वडिलांच्या कष्टाचं चीज
भोर : भोरमधील अक्षता शेटे (वय २५ वर्ष) हिने हवाई सुंदरी (एअर होस्टेस) चे प्रशिक्षण दिल्ली येथे पुर्ण केले असून ती २५ ऑगस्ट पासून इंडिगो एअरलाइन्स मध्ये कार्यरत होणार आहे. तिने केलेल्या कामगिरीमुळे भोर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटलं जातं. परंतु आजही काही ठिकाणी मुलगी जन्मला आली तर तिची अवहेलना केली जाते. ती जन्माला आल्यापासून ते शिक्षण-लग्न अशा अनेक गोष्टींमुळे आई-वडिलांच्या जीवाला घोर लागतो. परंतु हीच मुलगी जेव्हा आई-वडिलांचे नाव मोठ्या अभिमानाने जगभरात पसरवते तेव्हा कौतुकही तितकंच केलं जातं.
आपल्यापैकी अनेकजण बाल वया पासून स्वप्न पाहात असतात. वय वाढले की या स्वप्नांमध्ये देखील बदल होत जातो, असेच एक स्वप्न अक्षताने वयाच्या ११ व्या वर्षी पाहिले आणि ते आज सत्यात उतरवले असुन तिच्या या प्रवासामध्ये आई-वडिलांचे मोठे योगदान आहे.
तनिष्का व्यासपीठ अध्यक्ष सीमा तनपुरे, व ब्लू स्टार डिजिटल नेटवर्कचे सलीम आत्तार यांनी भोरमध्ये अक्षताच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी तिच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी तिचे कुटुंबीय आणि मित्र परिवारसह, सीमा तनपुरे, शाहिद आत्तार, मीना चव्हाण, शोभा गोसावी, भाग्यश्री शेटे, विनायक तनपुरे, सलीम आत्तार, किसान वीर, निसार नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते.




