भोरच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवाळी निमित्त आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा संपन्न
भोर : विद्या प्रतिष्ठानचे भोर इंग्लिश मिडियाम स्कूल, भोर येथे दिवाळीच्या उत्साहात आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी कागदांचा वापर करून नवनवीन व आकर्षक अशा प्रकारचे आकाशकंदील बनवले. प्रत्येक विद्यार्थ्याने कल्पकता, सर्जनशीलता व कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी मादगुडे मॅडम तसेच कलाशिक्षक दत्तात्रय महांगरे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांचे परीक्षण करून उत्तम कंदीलांना क्रमांक देण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक नव्हे तर सांस्कृतिक, सर्जनशील व सौंदर्यदृष्टीचेही मूल्य रुजविण्याचा हेतू साध्य झाला. अशा प्रकारे विद्यालयात आनंदी व शैक्षणिक वातावरणात दिवाळीपूर्व आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडली.