भारताचा पुढील पंतप्रधान महाराष्ट्राचाच होण्यासाठी ! डोंबिवलीच्या प्राध्यापक शिवा अय्यर यांचा महाराष्ट्र दौरा
नामदेव साळवे,
परभणी.
परभणी : महाराष्ट्रात दूरदृष्टीची कणखर काही राजकीय नेते मंडळी आहेत.दिल्लीचे तख्त सांभाळण्याचे काम दिल्लीच्या सत्तेला भक्कमपणे आधार देण्याचे काम महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी खंबीरपणे केले आहे. यापूर्वी महाराष्टाने देशाच्या सत्तेत महत्वाची भूमिका बजावली आहे. मग पंतप्रधान पदासासाठी महाराष्ट्रावर सतत अन्याय का असा प्रश्न करत यापुढील पंतप्रधान हा महाराष्ट्रीयनच असावा यासाठी डोंबिवलीचे प्राध्यापक शिवा अय्यर संपुर्ण महाराष्ट्र भर जनजागृती दौरा करत आहेत.
भारत देशाचे पंतप्रधान पद भूषविण्याचा मान सर्वाधिक उत्तरप्रदेशने म्हणजे ११ वेळा तर गुजरात राज्याला ४ वेळा हा मान मिळवला. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये ही पदे भूषविण्याची क्षमता असताना देखील ही संधी कोठल्याच राजकिय पार्टीने महाराष्ट्राला दिली नाही, पंतप्रधान पदाची नियुक्ती यापुढील काळात स्वच्छ चारित्र्याच्या पात्र राजकीय नेत्याप्रमाणे चक्राकार पध्दतीने करावी, महाराष्ट्रीयन नेत्याला यापुढचे पंतप्रधान पद मिळालेच पाहिजे.या मागणीसाठी प्रा. शिवा अय्यर राज्यव्यापारी दौरे करत असुन आता ते परभणी जिल्ह्यामध्ये आहेत.
प्राध्यापक शिवा अय्यर यांनी २० जुन रोजी स्वखर्चाने हा दौरा सुरु केला असुन ते गाव, शहर परिसरातील रेल्वे स्थानके, बस स्टॅन्ड, बाजारपेठेची ठिकाणी पंतप्रधान पदासाठी जनजागृती करत आहेत, यापूर्वी महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, माजी संरक्षण मंत्री शरद पवार अशा अनेक नेत्यांनी दिल्लीत आपला प्रभाव पाडला आहे. दूरदृष्टीचे केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात पंतप्रधान पद भूषवण्याची क्षमता आहे.अशी दूरदृष्टीची विचारवंत माणसे महाराष्ट्रात असताना राज्याला देशाचे पंतप्रधान पद का मिळू नये. हा प्रश्न उपस्थित करत आपण जनजागृती करत असल्याचे प्राध्यापक शिवा अय्यर यांनी सांगितले.