महाराष्ट्रात आगामी शैक्षणिक वर्षापासून CBSE पॅटर्न राबवणार ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासाठी CBSE सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून राबविण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. पुढील र्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु ज्याठिकाणी शाळांमध्ये पटसंख्या शून्य असेल अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करावा लागेल.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारेल. यामध्ये शाळेच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविणे, शाळेच्या विकासासाठी हातभार लावण्याची जबाबदारी घेणे गरजेचे असुन या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्यासह सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं.




