विजेचा शॉक लागुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू :अनेकांच्या मनाला चटका लावून गेला
पुणे : भोर तालुक्यातील कापूरहोळ याठिकाणी दि.18/7/24 (गुरुवार) सकाळी 10 :00 वाजण्याच्या सुमारास शेतात भात पिकाचे रोप पाहण्यास गेलेल्या मच्छिंद्र बबन आहिरे (42 वर्ष) नावाच्या तरुणाचा तुटलेल्या तारेचा शॉक लागुन दुर्दैवी मृत्यू झाला, या तरुणाचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
मच्छिंद्र आहिरे हा तरुण खाजगी कंपनीत काम करत होता,व सोबत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, गुरुवारी सकाळी मच्छिंद्र हा शेतात भाताचे रोप पाहण्यास गेला होता. शेताच्या कडेने फिरत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार कुटुंबीयांना व ग्रामस्थांना कळताच त्यांनी त्यास सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे खाजगी वाहनांतून नेले असता. तपासणी अंती त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृत घोषित करताच कुटुंबिय व ग्रामस्थांनी हंबरडा फोडला, कुटुंबामध्ये तो एकटाच कमावणारा होता, त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध वडील अशी जबाबदारी होती,या अपघातास विद्युत महावितरण जबाबदार असून कुटुंबीय व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, जोपर्यंत विद्युत महावितरण काही ठोस आश्वासन देत नाही,तो पर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही असे ठरवले असल्याने काही काळ राजगड पोलीस स्टेशन मध्ये तणाव निर्माण झाला होता.
काही वेळा नंतर महावितरण अधिकारी आले व त्यांनी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या पत्नीस विद्युत महावितरण मध्ये त्यांच्या शिक्षणा नुसार नोकरी करीता किंवा नुकसान भरपाई म्हणून जे-जे काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.




