केंदूर येथे विधवांसाठी हळदी-कुंकू सोहळा ! रूढींला तिलांजली देऊन माहेर संस्थेचा समाजात अनोखा आदर्श
वैभव पवार,
उपसंपादक.
केंदूर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात केंदूर येथे माहेर संस्थेच्या आनंद बालसदन शाखेच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून समाजात अनोखा आदर्श निर्माण केला. सौभाग्यवतींसाठी सण साजरे करतो, पण विधवा महिलांना रूढींच्या सापळ्यात अडकवतो, असा आरोप करत या कार्यक्रमाने नव्या समाजनिर्मितीचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. ‘सक्षमीकरण’ विषयावर मार्गदर्शन झाले. विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून वाण म्हणून साड्या वितरित केल्या. यामुळे महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शर्मिला थिटे (उपसरपंच), अश्विनी थिटे (माजी सरपंच), योगिता थिटे (माजी उपसरपंच), पौर्णिमा प. हाड, कविता गोरे उपस्थित होत्या.
माहेर संस्थेच्या वतीने तेजस्विनी पवार (प्रकल्प प्रमुख), राजू साकोरे, राजू तायडे, ऍड. आशाताई दळवी, मिनाताई भागवत व संस्थेतील मुले-महिला सहभागी झाल्या. प्रास्ताविक तेजस्विनी पवार यांचे, सूत्रसंचालन ऍड. आशा दळवी यांचे तर आभार मिनाताई भागवत यांनी मानले.
माहेर संस्थेच्या या उपक्रमाने विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश दिला. बदलत्या काळानुसार रूढीप्रथांना तिलांजली देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्यावा, असे मत पाहुण्यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद ठरला.




