पुणे ग्रँड टूर यशस्वी ! राजगड पोलिसांचे ग्रँड नियोजन !! कापूरहोळ पंचक्रोशीतुन सायकल स्पर्धेला तुफान प्रतिसाद
कापूरहोळ : नुकत्याच पार पडलेल्या ‘पुणे ग्रँड टूर चॅलेंज’ सायकल स्पर्धेचे सासवड-कापूरहोळ-भोर रस्त्यावरील टप्प्यातील आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरले. या २० किलोमीटर लांबीच्या टप्प्यात राजगड पोलिसांनी बजावलेली भूमिका आणि घडवलेला अभूतपूर्व जनसहभाग सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
स्पर्धक वेगाने सायकल चालवत असताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन वाखाणण्याजोगे होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकाने स्वतःच्या बळावर अवलंबून न राहता, परिसरातील संस्था, ग्रामस्थ आणि शाळा, महाविद्यालयांना सोबत घेऊन ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे आदर्श उत्तम उदाहरण दिले आहे.
प्रत्येक ५० ते १०० फुटांवर स्वयंसेवक आणि पोलिस कर्मचारी तैनात करून स्पर्धकांची पूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली. सासवड-कापूरहोळ दरम्यानच्या नारायणपूर, चिव्हेवाडी, देवडी, केतकावळे बालाजी मंदिर, दिवळे, हरिश्चंद्री तसेच कापूरहोळ पंचक्रोशीतील गावांतील नागरिकांनी जागजागी स्पर्धकांचे उत्साही स्वागत केले.
कापूरहोळ गावातील सर्व ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला शिस्त पाळून उभे राहुन मेन चौक आणि भोर फाटा चौकात ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंचा उत्साह वाढवला.
लोकांचा सहभाग आणि शाळा-महाविद्यालयांच्या उत्स्फूर्त मदतीमुळे ही मोठी स्पर्धा सुरळीतपणे पार पडली. नागरिकांचे सहकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भोर प्रांतअधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी सायकलस्वार अतिशय वेगाने पुढे जात होते, तरी कुठेही गोंधळ उडाला नाही. उलट सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
राजगड पोलिसांच्या या यशस्वी नियोजनामुळे भविष्यात अशा मोठ्या स्पर्धांसाठी हा परिसर सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे. कम्युनिटी पोलिसिंगच्या या मॉडेलमुळे पोलिस-जनतेचे नाते अधिक बळकट झाले असून, स्थानिक विकासाला चालना मिळेल, अशी आशा आहे.




