ताज्या घडामोडी

मुळशी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंदा घोगरेचा मा.आमदार संग्राम थोपटेच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश


मुळशी : मुळशी तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष आनंदा घोगरे यांनी गुरुवारी (२३ ऑक्टों.) भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना झालेल्या या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आनंदा घोगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे संघटनात्मक काम पाहत होते. मात्र, अलीकडील काळात पक्षातील काही निर्णय आणि अंतर्गत मतभेदांमुळे ते नाराज होते. आपल्या राजीनाम्यात त्यांनी ग्रामीण कार्यकर्त्यांवरील अन्याय आणि दुर्लक्ष याचा उल्लेख करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेताना संघटनात्मक पारदर्शकता आणि विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

या प्रवेशावेळी माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते. त्यांनी घोगरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत “त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या बळकटीकरणासाठी होईल,” असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्यात घोटावडे ग्रामपंचायतीच्या सदस्य निकिता मयूर घोगरे, रोकडेश्वर विकास सोसायटीचे प्रदीप भेगडे, माजी सरपंच शारदा गोडांबे, संचालक विलास शिंदे, तानाजी केसवड, सिंधुताई साठे, प्रभाकर गोडांबे, अशोक धुमाळ तसेच रिहे ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण बोडके यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

घोटावडे विकास सोसायटीचे विद्यमान व्हॉइस चेअरमन अनंता अमराळे यांच्यासह आणखी अनेक कार्यकर्त्यांनीही या प्रवेशातून नव्या राजकीय समीकरणाला आकार दिला आहे. भाजपच्या जिल्हा आणि तालुका नेतृत्वाने या सर्वांचे स्वागत करत विकासाच्या योजनांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजकीय वर्तुळात या घडामोडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मुळशी तालुक्यात भाजपचे संघटनिक बळ वाढल्याने स्थानिक निवडणुकीत नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशाचा नेमका परिणाम काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!