राजकीय

भोर नगरपालिका निवडणुकीत १२३ अर्ज दाखल ! नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकांसाठी तब्बल ११५ अर्ज !! भाजप-राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनात भोर निवडणूक बनली चुरशीची


भोर : भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस सोमवार दि. १७ नोव्हेंबर उत्साहात पार पडला. पहिल्या ७ दिवसांत केवळ १० अर्ज दाखल झाले होते, पण अंतिम दिवशी शहरात राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले. प्रमुख पक्षांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे नगरपरिषदेच्या परिसरात दिवसभर जयघोष, नारळफोडी आणि जल्लोषाचे दृश्य अनुभवायला मिळाले.

निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे आणि सहाय्यक अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी तब्बल ११५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भोर नगरपरिषदेतील एकूण २० प्रभागांतून २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.

दिनांक १० नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. प्रारंभी संथ गतीने अर्ज येत होते, परंतु शेवटच्या दिवशी निवडणूक रंगदार झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष दोघांनीही आपली ताकद दाखवत मोठ्या मिरवणुका काढल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत भोर बसस्थानकातून मिरवणूक काढली, तर भाजपने माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ चौपाटीहून शक्तीप्रदर्शन केले.

Advertisement

भोरच्या गल्लीबोळांत सर्वत्र बॅनर, झेंडे आणि ढोल-ताशांचा जल्लोष झळकत होता. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून खरी निवडणूक मोहिम सुरू झाल्याची प्रचिती नागरिकांना आली.

नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून संजय जगताप, नूतन जगताप आणि गणेश पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामचंद्र (नाना) आवारे आणि ऋषभ आवारे रिंगणात उतरले असून शिवसेनेचे नितीन सोनवले आणि अपक्ष म्हणून कविता खोपडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाची लढत बहुकोनी आणि चुरशीची होणार आहे.

अर्ज छाननी प्रक्रिया मंगळवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून कोणाचे अर्ज वैध ठरणार आणि अंतिम स्पर्धा कोणाकडे आकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत भोरचे राजकीय तापमान आणखी वाढणार याचे संकेत दिसत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!