भोर तालुक्यातील करंजगावात घरफोडी ! १७ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास
भोर : भोर तालुक्यातील करंजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश करत तब्बल १७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरमालक मारुती भैरु मळेकर (वय ६२, रा. करंजगाव, ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मळेकर पत्नीसह नातवाच्या शाळेतील पाचवीच्या कार्यक्रमासाठी महुडे (ता. भोर) येथे गेले होते. कार्यक्रम संपवून घरी परतल्यानंतर दरवाज्याचे कडी-कोयंडे तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉक तोडलेले असून त्यातील तीस हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे २८ तोळे ६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांनी पाहिले.
सध्या ग्रामीण भागात भातकापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी दिवसभर शेतात असल्याने अनेक घरे बंद असतात. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडण्याचे प्रकार वाढू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दिप्ती करपे आणि ठाणे अंमलदार सुनील चव्हाण करत आहेत.




