अनाथ आश्रमाच्या नावाखाली करत होते वेश्याव्यवसाय,दोघांना अटक
सातारा : दि. 21/8/24 (बुधवार) रोजी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामधील टेंभू गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. आई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या निराधार आश्रमामध्ये आश्रम चालक महिलेकडून लहान मुलींवर अन्याय करण्यात येत होता, आश्रम शाळेतील मुलींना अवैद्य दारु विक्री करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आलेला आहे, तसंच आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना वेश्या व्यवसायमध्ये गुंतवलं जात असल्याची तक्रार एका महिलेन केली आहे.
ही पीडित महिला सातारा जिल्ह्यातील असून बुधवारी ती थेट पोलिस मुख्यालयात पोहचली. त्याठिकाणी तीने आपबीती माध्यमांना कथन गेली. ही माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलिसांचे पथक साताऱ्यात पोहोचले. पोलिसांनी तिला कराडला आणले. तिची चौकशी करून फिर्याद घेतली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी तिची टेंभू येथील अनाथ आश्रम चालक महिलेशी ओळख झाली होती. तिने पीडितेला आश्रमात नेवून पैशासाठी देह व्यापार करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद पीडितेने दिली. या आश्रमात असलेल्या मुलींना पाय दाबायला लावणे, मारहाण करणे अशाप्रकारचे व्हिडिओ ही उपलब्ध आहेत. अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेकडून निराधार महिलांना सहारा देण्याचा बहाण्याने घरी बोलवून त्यांना जबरदस्तीने देह विक्री करण्यास भाग पाडलं जात होते.
पीडितेच्या फिर्यादीवरून कराड ग्रामीण पोलिसांनी अनाथ आश्रम चालक महिलेसह वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कराड) या दोघांच्या विरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 23 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.




