संविधान स्तंभावर घाणीचे साम्राज्य ! भोर नगरपालिकेकडून संविधान दिनी उदासीनता !! नागरिकांमध्ये संताप
भोर : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भोर नगरपालिका कडून झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील संविधान स्तंभ परिसरात पक्षांची विस्टा पसरली आहे. या ठिकाणी कचरा साचलेला असून, पक्ष्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ बनला आहे. आंबेडकर चळवळीतील युवक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक संविधान दिन साजरा करण्यासाठी स्तंभावर आले असताना अस्वच्छतेचे चित्र पाहून संताप व्यक्त करताना दिसले.
नागरिकांनी नगरपालिकेशी संपर्क साधल्यावर प्रशासनाने उलटपक्षी “यासाठी अधिकृत पत्रव्यवहार आवश्यक होता” असे उत्तर दिल्याने आंबेडकरी जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे. जनतेने आम्हाला पत्र द्यायला हवे होते; त्या शिवाय साफसफाईचे काम आम्ही करू शकत नाही असे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे वक्तव्य समोर आले.या भूमिकेमुळे सामाजिक संघटनांनी प्रशासनावरील उदासीनतेचा निषेध केला
संविधानाचे स्मारक म्हणजे जनतेच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. त्या ठिकाणाची स्वच्छता हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा असह्य आहे अशी भूमिका आंबेडकरी कार्यकर्ते स्वप्नील सावंत, नवनाथ कदम, प्रकाश ओव्हाळ व इतर मान्यवरांनी मांडली.
यावेळी संविधान दिन साजरा करण्यसाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांनी तातडीने परिसराची स्वच्छता व्हावी आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखभाल समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
आज संविधान दिनानिमित्त आंबेडकरी जनतेने संविधान स्तंभ व परिसर स्वतः स्वच्छ करत असताना काही नगरपालिकेचे कर्मचारी मदतीस आले तसेच तेथे असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचीही स्वच्छ्ता केली व संविधान दिन साजरा होत असताना उशिरा आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.
संविधान दिनासारख्या पवित्र प्रसंगी नगरपालिकेकडून दाखवलेली ही उदासीनता प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.




