पुणे स्टेशन-मनपा-पाषाण-बावधन-चांदणी चौक-कोथरुड डेपो-डेक्कन-मनपा-पुणे स्टेशन असा पुणे वर्तुळ मार्ग सुरू करा:आमदार शंकर मांडेकर
पुणे शहरात जलद गतीने होणाऱ्या विकास कामामध्ये PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, पुणे शहर लगत असणारे पाषाण, बावधन,चांदणी चौक,पौड या भागातून अनेक नागरिक, महिला,विद्यार्थी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपआपल्या दैनंदिन कामाकरिता रोज पुणे स्टेशन पर्यंत प्रवास करत असतात.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू असलेला मार्ग क्रमांक १०९ व मार्ग क्रमांक ११० हा मार्ग मनपा ऐवजी पुणे स्टेशन येथून सुरू करण्याची मागणी भोर मुळशी राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने मार्ग क्रमांक १०९ मनपा ते मनपा व मार्ग क्रमांक ११० मनपा ते मनपा हे दोन मार्ग गेले अनेक वर्षांपासून मनपा येथून सुरू आहे.
परंतु बावधन, चांदणी चौक पाषाण परिसरातील नागरिक व कर्मचारी विद्यार्थी यांना प्रशासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, व इतर प्रशासकीय कामानिमित्त सेंट्रल बिल्डिंग तसेच पुणे रेल्वे स्थानकावर यावे लागते. पुणे स्टेशन ला येण्यासाठी कमी प्रमाणात बससेवा उपलब्ध असल्याने नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी यांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपा बस स्थानक येथून सुटणारे १०९ व ११० हे दोन्ही वर्तुळ मार्ग पुणे स्टेशन येथून सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.




