दोन वर्षांची चिमुरडी अट्टल गुन्हेगार ? कल्याण पोलिसांचा अजब कारनामा
सौरभ घोडके,
प्रतिनिधी.
कल्याण : दिनांक २५ ऑक्टोबर पोलीस आणि वकील यांच्या नादाला लागू नये असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. कारण एकदा त्यांच्या कचाट्यात सामान्य नागरिक सापडला की सुटका होणं कठीणच पण याही पुढे नेणारी धक्कादायक घटना आता कल्याणमध्ये घडली आहे.
लहुजी नगर परिसरात काही गावगुंडांनी दगडफेक करत स्थानिक महिलांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला होता. या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झालाच होता, मात्र तपासाच्या नावाखाली पोलिसांनी असा प्रकार केला की सर्वव्यापी खळबळ उडाली. संबंधित गुन्ह्याच्या यादीत आरोपींच्या नावाखाली एका दोन वर्षांच्या चिमुरडीचे नाव खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात टाकले गेले आहे, खुनाचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणात एखाद्या अल्पवयीनावर आरोप ठेवणं समजण्यासारखं असलं तरी, दोन वर्षांच्या बालिकेवर असा आरोप ठेवण्यात पोलिसांनी कोणत्या नियमाच्या आधारे कारवाई केली, हा प्रश्नच नागरिकांपुढे उभा राहिला आहे.
अटक आरोपींना जेव्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा वकिलाने न्यायाधीशांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्या बरोबर संपूर्ण कोर्टात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. तपास अधिकार्यांचे उत्तर ऐकून न्यायालयालाही भंबेरी उडाली. परिणामी प्रकरण आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणी अंतर्गत जाण्याची शक्यता असून जबाबदार पोलिसांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
शहरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा कसा ? या प्रश्नाने संपूर्ण कल्याण हादरून गेले आहे. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती सुधारात्मक पावले उचलली जातील, हे पाहणे आता सर्वांच्या लक्षात आहे.




