मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
किशोर पवार,
मुळशी.
पिरंगुट (ता. मुळशी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुळशी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी वेगात सुरू केली आहे.
घोटावडेफाटा येथील सुंदरबन मंगल कार्यालयात झालेल्या या मुलाखतींना आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगतदार सुरुवात झाली.या बैठकीत तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणांसाठी एकूण ३३ तर जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी १२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणामुळे परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी सर्वात वेगाने सुरू असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.आरक्षण सोडत घोषित होण्यापूर्वीच अनेक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील कामे सुरू केली होती. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांनी जनतेशी थेट संवाद साधत आपल्या प्रचाराची पायाभरणी केली आहे. गणेशोत्सवापासून आजपर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आणि बैठकींचे आयोजन करून जनसंपर्क वाढविण्याचे काम केले आहे.
या मुलाखती दरम्यान पंचायत समितीकरिता पौड गणातून ४, अंबडवेट गणातून ९, माण आणि हिंजवडी गणातून प्रत्येकी ४, पिरंगुट गणातून ७ आणि भूगाव गणातून ५ इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. तसेच जिल्हा परिषदेच्या पौड-अंबडवेट गटातून ३, माण-हिंजवडी गटातून ४ व पिरंगुट-भूगाव गटातून ५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे यांनी दिली
यावेळीं बैठकीस विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले. स्वागत सुखदेव मांडेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी सादर केले. शेवटी आभार प्रदर्शन निलेश पाडाळे यांनी मानले.
या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मुळशी तालुक्यातील निवडणूक मोहिमेची औपचारिक सुरुवात केली असून पक्षाच्या पुढील रणनितीला यामुळे गती मिळाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.




