किकवी गावातून दिवसाढवळ्या मोटारसायकल चोरी
किकवी : भोर तालुक्यातील मौजे किकवी गावात दिवसाढवळ्या झालेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.फिर्यादी विजय लक्ष्मण मोरे (वय 43, रा. मोखाडी, ता. भोर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारास 11.15 ते दुपारी 1.00 वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली काळ्या-निळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो (MH 12 JY 4564) ही मोटारसायकल मौजे किकवी गावातील मोरे टेलर कपड्याच्या दुकानासमोर हँडल लॉक करून पार्क केली होती. तेथून अज्ञात चोरट्याने ती मोटारसायकल चोरून नेल्याचे आढळले.सदर मोटारसायकलची किंमत अंदाजे 25,000 रुपये असून तिचे इंजिन क्रमांक HA10EKDHA03993 व चॅसिस क्रमांक MBLHA10APDHA26487 असा आहे.
मोटारसायकलचा ठावठिकाणा न लागल्यामुळे तक्रारदार मोरे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 3.50 वाजता राजगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 382/2025 हा भारतीय नव दंड संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी दाखल अंमलदार म.पो. हवा. निकम (ब.नं. 1054) असून तपास पो. हवा. मदने (ब.नं. 2320) यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मोटरसायकल चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे. राजगड पोलीस याबाबत गांभीर्याने तपास करत असून चोरट्याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




