सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू : तिघेही महाबळेश्वरचे रहिवाशी
महाड : महाबळेश्वरच्या तीन पर्यटकांचे महाड येथील प्रसिद्ध दर्ग्याचे दर्शन घेऊन येत असताना तेथील सावित्री नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून ते दोघेही विवाहित होते, दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेला एकजण पाय घसरून सावित्री नदीत पडला असता,त्याला वाचविण्यासाठी गेलेले अन्य दोघेही पाण्यात उतरले तिघांनाही पोहता येत नसल्याच्या कारणामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे त्यांचे कुटुंबीय व स्थानिक लोक सांगत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे महाबळेश्वर शहरावर शोककळा पसरली आहे. महाबळेश्वर शहरातील दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनावर शहाबुद्दीन नालबंद, जाहिद जाकीर पटेल हे तिघे जण महाड येथे दर्ग्याच्या दर्शनास गेले होते. महाड येथीस एनडीआरएफ टीमच्या माध्यमातुन या तिघांचा शोध घेण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले होते. दरम्यान तिघांचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
महाड येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी तिघांचेही मृतदेह पाठवण्यात आले आहेत,दरम्यान या तरुणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह, नातेवाईक, मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




