श्री क्षेत्र बनेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन
नसरापूर : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यांतील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त बुधवार 26 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता भोरचे प्रांत अधिकारी विकास खरात आणि तहसिलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि महाआरती संपन्न झाली, त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले, श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर पुरातनकालीन असून महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातून लाखो भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
महाशिवरात्रीच्या निमित्त बनेश्वर या प्रसिद्ध मंदिरामध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतले, मंदिर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले, भाविकांच्या सुकर दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक हे उपाययोजना केल्या होत्या.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती, दर्शन बारीसाठी मंडप, वीज वितरण कंपनीच्या वतीने या भागातील वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली गेली होती, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत मंदिर परिसरात आरोग्य पथक तैनात ठेवण्यात आले होते, वन विभागाच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यात येत होती.




