शिरकोलीतील विकासकामातील भ्रष्टाचाराचा निषेध ! माजी उपसरपंचाने फोडल्या पंचायत समितीच्या काचा
राजगड (वेल्हा) : पानशेत, ता. राजगड(वेल्हा) परिसरातील दुर्गम शिरकोली गावातील विकासकामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात स्थानिक माजी उपसरपंच मास्ती मरगळे यांनी पंचायत समिती कार्यालयात थेट काचेचे नुकसान करून निषेध नोंदवला. या घटनेने परिसरातील प्रशासन आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मरगळे यांनी सांगितले की गावातील डांगखिंड धनगर वाडीत रस्ता आणि पाणीपुरवठा यांसारख्या कामांवर सरकारी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही. मात्र खोटी बिले काढून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आले. या निष्क्रियतेमुळे १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत एका ज्येष्ठ महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा त्यांचा आरोप आहे. मृत महिलेला रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्थेमुळे पाच ते सहा किलोमीटर अंतर चालत झोळीत वाहून नेण्याची वेळ आली होती.
या घटनेनंतर बुधवारी (ता. २९) दुपारी बाराच्या सुमारास मरगळे यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरील काचा फोडत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. घटना घडताच अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि रात्री उशिरापर्यंत वेल्हे पोलिस ठाण्यात शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन भगवानराव पासलकर म्हणाले की पंचायत समितीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत नाहीत. त्यांनी ग्रामविकासविषयक माहिती मागितल्यावर उत्तर न दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या समवेत आनंद देशमाने, लाला रेणुसे, मारुती मरगळे, शंकर ढेबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गटविकास अधिकारी संजय डमाळ यांनी सांगितले की, मागितलेली माहिती न मिळाल्यास शासकीय पद्धतीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजगड (वेल्हे) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी सांगितले की, घटनेबाबत पंचायत समितीतील अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.




