राजगड (वेल्हा) उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य ! आरोग्याची ऐसी की तैसी : संतोषआप्पा दसवडकर
राजगड : उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात. मात्र सध्या याच रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयातल टॉयलेट बाथरूम तसेच ठिकठिकाणी कचरा, वाया गेलेले अन्न, बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, बाटल्यांची तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजगड (वेल्हा) तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी रुग्णालयामध्ये येतात. दररोज येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते. त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या संख्येचा विचार केल्यास या ठिकाणच्या परिसराचा, स्वच्छतागृहाचा, कॉरिडोरचा वापर केला जातो. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी कचरा, फेकलेले अन्न, बाटल्या, सिगारेटची पाकिटे, गुटख्याच्या पुड्या अशा प्रकारचा कचरा जमा होतो. रुग्णालयाचा वापर मोठ्या संख्येने होत असल्याने तेथील स्वच्छताही सातत्याने राखली जाणे गरजेचे आहे.
संदिप दिघे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी स्वतःचा अनुभव सांगत रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत, ते स्वतः रुग्णालयामध्ये ऍडमिट असताना इतर येणाऱ्या रुग्णांकडून तोंडी माहिती घेऊन त्यांची कोणतीही प्राथमिक तपासणी न करताच त्यांना औषधी दिली जात आहेत, रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट भाषेमध्ये बोलत असतात, टॉयलेट व बाथरूम अस्वच्छ अवस्थेत असते, रुग्णालय प्रशासनाला स्वच्छतेबाबत गांभीर्य नाही.
संतोष दसवडकर (मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष) यांनी सांगितले की राजगड (वेल्हा) रुग्णालयात आरोग्याची ऐसी की तैसी झाली आहे, रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, रुग्णांची गैरसोय यावरून सत्ताधाऱ्यांचा विकास केवळ खोटा दिखावा असल्याचे स्पष्ट होते, जनतेचा जीव धोक्यात टाकून पुढारी फक्त विकासाच्या गप्पा मारत आहेत, राजगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारवी तसेच गोर-गरिब रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत, त्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी यावेळी केली.




