आर्वी येथे शेततळ्यात बुडून १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
खेडशिवापूर : हवेली तालुक्यातील आर्वी येथे शेततळ्यात बुडून १० वर्षीय खुशबू बसंत बसदेवा हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू बसंत बसदेवा (वय १०) ही आपल्या भावंडांसह व इतर मुलांसोबत आर्वी येथील संजय हरिभाऊ घोगरे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान पाण्यात उतरल्यानंतर तिचा तोल जाऊन ती खोल पाण्यात बुडाली.
स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम राबवून तिला बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
खुशबूचे वडील बसंत बसदेवा यांना घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप घोगरे यांनी दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलीला उपचारासाठी श्रीरामनगर-बांडेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




