ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र ! दलित वस्ती सुधारणा निधी खोटी कागदपत्रे दाखवून लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश : सभापती जितेंद्र बडेकर


पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कडक पत्र देऊन दलितवस्ती सुधारणा निधीचा बेकायदेशीर वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनांतील कामे संबंधित वस्त्यांमध्येच करावीत, अन्यथा ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या दलितवस्ती सुधारणा निधीतून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होतो. मात्र, बोगस कायदोपत्रे दाखवून हा निधी वस्तीबाहेर खर्च होत असल्याच्या तक्रारींना आता आळा घालण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाने वस्ती विकास योजनांतील मंजूर कामे वस्तीतच करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हे पालन झाले नाही तर ग्रामपंचायतस्तरावरील ग्रामविकास अधिकारी दोषी ठरतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असे पत्रात नमूद केले आहे.

Advertisement

सभापती जितेंद्र बडेकर यांच्या पत्रानुसार, वस्तीबाहेर कामे केल्याचे आढळल्यास ग्रामपंचायत अधिकारी व शाखा अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित होईल. प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच, लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांकडून तक्रारी आल्यासही संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे निधीचा योग्य वापर होईल आणि लाभार्थी वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळेल.

या उपक्रमामुळे दलित व नवबौद्ध समाजातील वस्त्यांचा खरा विकास होईल, असा विश्वास बडेकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा जबाबदारी ठरेल, असाही इशारा त्यांनी दिला. या पत्राने ग्रामीण भागातील विकास योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!