ताज्या घडामोडी

प्रेमसंबंधातील तणावातून तरुणाची आत्महत्येची धक्कादायक घटना ! उपचारादरम्यान मृत्यू


अजित कोंढरे,
प्रतिनिधी.

बारामती : बारामती येथे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय अविष्कार अमोल ढोले याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अविष्कार ढोले हा मूळचा कुरवली (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. शनिवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

Advertisement

घटनेनंतर त्याला तातडीने बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.

दरम्यान, मूळ गावी एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती सुजित रवी घोडके (वय १९) यांनी पोलिसांना दिली. बारामती तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. पिस्तुलाचा स्रोत व घटनेमागील सर्व बाबींचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!