अतिवृष्टीच्या रेड अलर्टमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी ! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनुसार पुणे जिल्ह्यात विशेषतः घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून काही भागांत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पूर, दरडी कोसळणे व वाहतुकीवरील परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच सर्व अंगणवाड्या यांना ६ जुलै रोजी सुट्टी लागू राहणार आहे.
तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले आहे.




