ताज्या घडामोडी

कापुरहोळमध्ये प्रतिबंधित पानमसाला अन् सुगंधित तंबाखूचा २२ लाखाचा साठा जप्त ! राजगड पोलिसांची पहाटे मोठी कारवाई


कापुरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील कापुरहोळ (भोर) येथे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राजगड पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली. या कारवाईत टेम्पोसह तब्बल २२ लाख ३४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, कोल्हापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध तंबाखू वाहतुकीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मंगळवारी (दि. ३) पहाटे साडेचारच्या सुमारास कापुरहोळ गावच्या कमानीसमोरील सर्व्हिस रोडवर पोलिसांनी हा टेम्पो अडवून तपासणी केली. यावेळी त्यामध्ये प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. सुजल बाळासाहेब धातोंडे (वय २२) आणि ओंकार राकेश शिंगाडे (वय १८, दोघेही रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.

Advertisement

जप्त मालामध्ये रजनीगंधा, विमल पानमसाला, तुळसी जाफरानी जर्दा आणि व्ही-१ तंबाखूचा समावेश आहे. जप्त मुद्देमालात ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या टेम्पोचाही समावेश आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सायली टाव्हे यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठादार, खरेदीदार आणि संबंधित कंपन्यांच्या संचालकांची भूमिका तपासली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुणे, निपाणी आणि इंदूरपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व पोलीस हवलदार गुंडगे करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!