भोरच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा ! दत्तात्रय पांगारे यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर !! आळंदे जिल्हा परिषद शाळेचा जिल्हाभर गौरव
कापूरहोळ : भोर तालुक्यातील आळंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय गोरक्षनाथ पांगारे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्रतिष्ठेच्या ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२६’ साठी निवड झाल्याने भोर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विद्यार्थीकेंद्री, नावीन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दत्तात्रय पांगारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभिनव उपक्रम राबविले आहेत. स्कॉलरशिप परीक्षांमधील उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण करण्यासाठी नासा व आयएसओ संकल्पनांशी निगडित उपक्रम, तसेच क्रीडा, पर्यटन, धावपटू आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक योगदान देणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा भोर तालुक्यातून दत्तात्रय पांगारे यांची निवड झाल्याने आळंदे गावासह संपूर्ण तालुक्याचा सन्मान उंचावला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




