नव्या स्वप्नांना नवी दिशा ! शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासाची नवी सुरुवात !! एसएनडीटी होम सायन्समध्ये ‘दीक्षारंभ 2026’ उत्साहात
पुणे : दि. 10 ऑगस्ट (सोमवार) एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनींसाठी आयोजित ‘दीक्षारंभ 2026′ Student Induction Programme’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. 10 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींना महाविद्यालन वातावरण, अभ्यासक्रम, विविध शैक्षणिक उपक्रम आणि उपलब्ध संधींची माहिती देतानाच आत्मविश्वास, सामाजिक जाणीव व सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
उद्घाटन सत्रात प्रसिद्ध लेखक, ब्रँड कन्सल्टंट व भारतीय इतिहास-संस्कृतीचे अभ्यासक अभिजित जोग यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. Baby Boomers, Millennials आणि Gen Z अशा पिढीच्या लेबल्समध्ये स्वतःला मर्यादित न ठेवता स्वतंत्र विचार करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय इतिहास व संस्कृतीतील महिलांचे योगदान, कुटुंबमूल्ये, देशप्रेम आणि सामाजिक एकोपा यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.यानंतर न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी ‘Building Healthy Habits’ या विषयावर मार्गदर्शन केले. संतुलित आहार, पौष्टिक नाश्ता, पुरेशी झोप, नियमित जीवनशैली तसेच डिजिटल साधनांचा योग्य व मर्यादित वापर याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वयक अनुजा किणीकर यांनी ‘दीक्षारंभ’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी विद्यार्थिनींना विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘दीक्षारंभ 2026’ हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रेरणादायी व आत्मविश्वासपूर्ण प्रारंभ ठरत आहे.




