पुरंदरच्या कोडीत येथे श्रीनाथ म्हस्कोबा पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ! लाखो भाविकांची उपस्थिती !! जगभरातील १२१ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक
सासवड : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोडीत येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा यांची ४० दिवसांनंतर भव्य पुनःप्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशाला जलाभिषेक सोहळा मोठ्या श्रद्धा-भक्तीने संपन्न झाला. अक्षय तृतीया निमित्त ब्रह्मकलशोत्सव, महायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली.
श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भारतातील १२१ नद्यांचे व जगभरातील नद्यांच्या पाण्याने सुवर्ण कलशाला अभिषेक करून सुरू झाला.वीर देवस्थानचे ट्रस्टी व जमदाडे, राऊत व्हटकर, शिंगाडे, तरडे, बुरुंगले, ढवान, या मानकरांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.
दि. १८ एप्रिलला श्रीनाथ म्हस्कोबा कोडीत डॉट ऑर्ग वेबसाइटचे उद्घाटन संदीप काळुराम बडदे यांनी ५२ हजार रुपयांची ऑनलाइन देणगी देऊन केले. दि. ९ रोजी संतवाणी भाष्यकार ह.भ.प. श्रीगुरू शेखर देगलूरकर महाराजांच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला.
सोमवारी (दि. २०) सकाळी महारुद्र अभिषेकानंतर मंदिर दर्शनार्थ खुले करून ४१ जोडप्यांसह होमहवन सुरू झाले. कोडीत गावातील शेकडो महिलांनी मोदक बनवून मिरवणूक काढली व ते होमहवनासाठी अर्पण केले. दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी ह.भ.प. कन्होबा महाराज देहूकर (तुकाराम महाराज वंशज) यांची कीर्तनसेवा झाली. लाखो भाविकांच्या सहभागाने सोहळा अविस्मरणीय ठरला.




