विक्रम खुटवड यांच्या शुभहस्ते हरिश्चंद्रीत विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
कापूरहोळ : भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात रविवार दि. 09 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमीपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, हा कार्यक्रम मा.श्री. विक्रम काशिनाथराव खुटवड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही कामे ठरली आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले असून या कामासाठी 26.50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच हरिश्चंद्री येथील अंतर्गत रस्त्यांचे भूमीपूजन 12.50 लाख रुपये खर्चून करण्यात आले. गावाच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी अत्यावश्यक असलेल्या मारुती मंदिर सभामंडपाच्या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालय ब्लॉकसाठी 3 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी विक्रम खुटवड यांनी ग्रामविकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांनी घ्यावा, तसेच विकासकामांत जनसहभाग वाढवावा, असे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.या प्रसंगी गावातील नागरिकांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
हरिश्चंद्री गावातील या विकासकामांमुळे स्थानिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील तसेच गावाचा विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केला.




