ताज्या घडामोडी

राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकीची रणधूमाळी सुरू ! राज्य निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर


 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे बंधन असल्याने राज्य निवडणूक आयोगाने अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेसोबतच आजपासून आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या निवडणुका ओबीसी आरक्षण आणि विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.

Advertisement

विरोधकांनी मतदार याद्यांतील घोळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली होती. पण आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करत, ठरलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
– अर्ज दाखल करण्याची सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
– अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर २०२५
– छाननीची तारीख – १८ नोव्हेंबर २०२५
– अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
– अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
– चिन्ह वाटप व अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
– मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५
– मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

राज्यातील बहुतांश नगरपरिषदांची मुदत संपल्याने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार असला तरी, स्थानिक संस्था निवडणुकांत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने प्रशासन तसेच सर्व राजकीय पक्षांना आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय रंगमंच पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!