वेळू-नसरापूर गटातून गणेश बागल यांची उमेदवारीची तयारी
नसरापूर : वेळू-नसरापूर गटातून येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवीन हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी उपसभापती रोहिणी बागल यांचे पती गणेश बागल यांनी शरद पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या इच्छुकतेमुळे या गटात सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही गोटात चर्चा रंगल्या आहेत.
गणेश बागल हे गेल्या काही वर्षांपासून समाजकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पक्षातील विविध स्तरांवर काम करत नेतृत्वाचा अनुभव मिळविला आहे. त्यांच्या सहज व संपर्कक्षम स्वभावामुळे मतदारांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. स्थानिक विकासकामांबाबत त्यांनी केलेले प्रयत्न आणि लोकसहभागातून उभारलेली कामगिरी त्यांच्या उमेदवारीस बळकटी देत आहे.
माजी उपसभापती रोहिणी बागल यांच्या राजकीय कार्यकाळात बागल कुटुंबाचे गटात चांगले योगदान राहिले आहे. त्यामुळे गणेश बागल यांच्या इच्छुकतेकडे वरिष्ठ नेतृत्वही सकारात्मकतेने पाहत आहे. शरद पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गटातील इतर काही दिग्गज नेत्यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत स्पर्धा चुरशीची होणार आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. पुढील काही दिवसांत पक्षाच्या तिकीट वाटप प्रक्रियेतून अंतिम चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी वेळू-नसरापूर गटात गणेश बागल यांच्या इच्छुकतेने वातावरण रंगले आहे, हे निश्चित.




