पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी ; जन्मस्थळाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार : आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री)
उन्मेश जगताप,
पुरंदर.
नारायणपूर : १४ मे २०२५ (बुधवार) किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात पार पडली, जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार व मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या संवर्धनासाठी सर्वपरी प्रयत्न करू असे शंभु भक्तांना आश्वासन दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. शेलार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचित आहे. संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला ९ वर्षे सळो की पळो करुन सोडले होते, छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. तसेच महाराष्ट्रातील संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरीत असल्याचे पहायला मिळेल. आता कसबा येथे सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल असे ते म्हणाले.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याला प्रचंड ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा व्हावा अशी मागणी यावेळी मंत्री महोदयांना केली.
कार्यक्रमास आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.




