कापूरहोळला पावसाने झोडपले ! तासाभरात रस्त्यावर पाणीच पाणी ; हायवेच्या नियोजनशून्य कामावर स्थानिक भडकले
कापूरहोळ : दि. 18 मे (रविवार) कापूरहोळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील साईस्पर्श बिल्डिंगसमोरील बायपास पुलामध्ये व सर्व्हिस रोडला पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते, गुडघाभर पाणी साठल्याने जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते, त्यामध्ये आज रविवार सुट्टी असल्याने जेजुरी-सासवड-नारायणपूर-बालाजीमंदीर या तीर्थक्षेत्राला भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे ट्राफिक ज्यादा झाले होते.
याबाबत कापूरहोळ गावचे युवा उद्योजक प्रसाद देवघरे यांनी हायवेवरील कामामुळे निर्माण झालेली ट्राफिक समस्येबाबत तात्काळ दखल घेऊन ट्राफिक परिस्थितीची स्वत: त्याठिकाणी जाऊन पाहणी करून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी NHAI (एन.एच.ए.आय) प्रमुखांना दूरध्वनीद्वारे कापूरहोळ येथील पुलाच्या कामाची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन स्विच ऑफ होते, पावसाने महामार्गांवर पाणी साठल्याने कशा प्रकारे ट्राफिक समस्या उद्भवते याची दखल घेत हायवेच्या नियोजनशून्य कामावर संताप व्यक्त केला. हायवेच्या नियोजनशून्य कामामुळे सामान्य नागरिकांना पहिल्या पावसातच समस्येला सामोरे जावे लागले यामध्ये सुधारणा करून तात्काळ कापूरहोळ येथील साईस्पर्श बिल्डिंग समोरील पुल व भोर फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावर साठलेले पाणी जाण्यासाठी ड्रेनेज मार्ग करावा आणि इथून पुढील काम नियोजन पद्धतीने करावे अशी सक्त मागणी केली आहे.
प्रसाद देवघरे यांनी जिथे पाणी साठले आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः तसेच इतर स्थानिक नागरिक व जीसीपीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी मार्ग करुन दिला व त्यानंतर काही वेळातच ट्राफिक पूर्ववत झाले. प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीमधुन खाली उतरून त्यांचे आभार मानले.




