संभाजी ब्रिगेडचे भोर तहसीलदार कार्यालयामध्ये घोषणा देऊन आंदोलन
भोर : 28 जानेवारी 2025 मंगळवार भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. गावातील शेतकरी चव्हाण कुटुंबीयांनी गावामध्ये शाळेसाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वतःच्या मालकीची जागा शाळेसाठी दान करण्याचे ठरवले त्यामुळे चव्हाण कुटुंब ग्रामपंचायतीला बक्षिसपत्राद्वारे जागा देण्यासाठी इच्छुक होते,परंतु ती जागा भोगवटा वर्ग 2 ची असल्याने तो गट ब्लॉक होता. भोगवटा वर्ग 2 च्या जमीनी शासनाने ब्लॉक केल्यामुळे दस्त रजिस्टर होत नव्हता. सदरचे ब्लॉक काढण्यासाठी 4 महिन्यांपूर्वी चव्हाण कुटुंबीय व ग्रामस्थांनी मिळून संबंधित प्रस्ताव भोर तहसीलदार कार्यालयात दाखल केला होता. अनेक वेळा माननीय तहसीलदार राजेंद्र नजन साहेब यांना विनंती केली. तरी देखील विनाकारण संबंधित फाईल पडून असल्याचे मत ग्रामस्थांच्या आहे.
संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सिध्दार्थ कोंढाळकर, सरपंच सागर शिंदे, वनसमिती अध्यक्ष दादासाहेब शेलार, दशरथ मांढरे, विकी होनखंडे व ग्रामस्थ यांनी संबंधित प्रस्तावाबाबत तहसीलदार कार्यालयामध्ये घोषणा देऊन आंदोलन केले. सदरचे आंदोलन चालू होताच मा.तहसीलदार यांनी तातडीने सातबारा (7/12) ब्लॉक काढण्याचे आदेश दिले व दस्त नोंद करण्यास मंजुरी दिली.
भोर तालुक्यातील अनेक गावांमधील सातबारे (7/12) ब्लॉक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबण्यासाठी भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी खालसा करून घेण्यासाठी विशेष मोहीम गाव पातळीवर राबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील राहील असे सिद्धार्थ कोंढाळकर यांनी सांगितले.




