महामार्ग पोलीस सारोळा यांच्या वतीने वाहन चालक मालकांना रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती अंतर्गत वाहतूक नियमांचे धडे
कापूरहोळ :रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी महामार्ग पोलीस सारोळा यांच्यावतीने वाहन चालक, मालक तसेच स्थानिक व इतर प्रवासी यांना कापूरहोळ चौकामध्ये वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.
रस्ते सुरक्षा विषयक नियमांबाबत महामार्ग पोलीस सारोळा यांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. रस्त्याचा वापर करताना प्रत्येक वाहनचालकाने परस्परांची काळजी घ्यावी, दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर तर चारचाकी वाहनाने प्रवास करतांना सीट बेल्टचा नक्की वापर करावा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, कानाला हेडफोन लावू नये, गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे याविषयी माहिती देण्यात आली. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे निदर्शानास आल्यास निसंकोच मानाने मदत करावी, तुमची छोटीसी मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते, शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन केल्यास प्रवास करताना आपल्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक भार्गव साखरे यांनी केले.
यावेळी महामार्ग पोलिस सारोळा पोलीस उपनिरीक्षक साखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पोलिस अंमलदार खुटवड, निगडे,ओव्हाळ, जाधव, शिंगाडे, पड्याळ या अधिकाऱ्यांबरोबर चंद्रकांत गाडे, जनार्धन गाडे,अतुल बाठे, विशाल बरदाडे, श्रीकांत गाडे,नवनाथ कोंढाळकर, राहुल चिव्हे, संभाजी भिंताडे,अनिल जाधव,दिपक भालघरे तसेच वाहन चालक मालकांसह स्थानिक लोक उपस्थित होते.




