क्राईम

पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्दच्या बनावट ग्रामसभा प्रकरणी ९ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल : दोषीमध्ये हवेली बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांचा समावेश


पुणे : हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द खोटी, बनावट व बोगस ग्रामसभा दाखवणारे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे इतर सहकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तक्रार संदीप उंद्रे यांनी दाखल केली होती. या प्रकरणी प्राप्त चौकशीमध्ये बोगस व बनावट ग्रामसभा प्रकरणी ९ जणांवर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामपंचायत मांजरी खुर्द येथे एक विशेष ग्रामसभा झाली होती असे दाखवण्यात आले या ग्रामसभेच्या ठराव क्रमांक ६४ अंतर्गत शंभू महादेव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मालकीची अण्णासाहेब मगर विद्यालयाची इमारत आणि १०० गुंठ्यांची शाळेची जमीन गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन या नव्या संस्थेच्या नावे हस्तांतरित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

संदीप ज्ञानोबा उंद्रे या ग्रामस्थाने माहिती अधिकार कायद्या अंतर्गत चौकशी केली असता ती ग्रामसभा प्रत्यक्षात झालीच नव्हती हे धक्कादायक सत्य समोर आले, या ग्रामसभेला एकूण १३ सदस्य उपस्थित असल्याचे दाखवले गेले होते, प्रत्यक्षात केवळ ६ सदस्यच उपस्थित होते आणि प्रत्यक्षात त्या ठरावावर ६ जणांच्याच सह्या असल्याचे निदर्शनास आले, उर्वरित सदस्यांचे ना सह्या होत्या ना ते त्या ग्रामसभेला उपस्थित होते. इतकेच नव्हे तर, ठराव मंजूर करताना अनुमोदक आणि सुचक यांची  नावे व सह्या नसतानाही तो वैध ठरवण्यात आला होता.

या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य व इतर दोशींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती हवेली पुणे यांनी काढले होते. परंतु सदर प्रकरणी ज्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश होते, त्या दोषींनी जिल्हा परिषदेकडील निर्देश तसेच पंचायत समिती हवेलीकडील आदेशाविरुद्ध गिरीश महाजन तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल करून दि. १२/०९/२०२२ रोजी स्थगिती मिळवली होती. यामुळे दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया खोळंबली होती.

Advertisement

ग्रामविकास मंत्र्यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध तक्रारदार ग्रामस्थ संदीप उंद्रे यांनी मा. उच्च न्यायालयात रिट याचिका १२२/२०२५ दाखल केले होते. सदर याचिकेच्या दिनांक ०९/०४/२०२५ रोजीच्या आदेशात मा. उच्च न्यायालयाने सदर याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत मंत्री (ग्रामविकास) यांच्या कडील स्थगिती आदेशालाच स्थगिती दिली. तसेच चौकशी अहवाल आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गुन्हा दाखल करण्यात आलेले सदस्य पुढील प्रमाणे

१) रोहीदास दामोदर उंद्रे

२) विकास दामोदर उंद्रे

३) हिरामण भुजंग गवळी

४) धनश्री महादेव उंद्रे

५) बेबी विलास उंद्रे

६) मनिषा रघुनाथ उंद्रे

७) वर्षा धर्मेंद्र मोरे

८) रामदास शिवराम ऊर्फ शिवाजी उंद्रे

९) विठ्ठल सुभाष सावंत

पोलीसांनी तक्रारदाराच्या लेखी निवेदनावरून गुन्हा नोंदवला असून, नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये १) फसवणूक (कलम ४२०), २) खोटे दस्तऐवज तयार करणे (४६५) ३) फसवणुकीसाठी खोटे दस्तऐवज तयार करणे (४६८) ४) खोटा दस्तऐवज खरा म्हणून वापरणे (४७१) ५) सामुहिक उद्देश (३४) या कलमांचा समावेश आहे.

या प्रकारच्या गुन्ह्यांमधून भविष्यात ग्रामपंचायत कामकाजात हुकुमशाही व दहशत निर्माण करून बोगस, बनावट कामे, घोटाळे व गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याची मोठी जरब बसेल अशी आशा आहे. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून पुढील पुरावे व जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरकारी दस्तऐवजांमध्ये बनावट नोंदी व त्याचा वापर करून शासनाच्या धोरणांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!