नसरापूर बाजारपेठेत घटस्थापनेसाठी लागणा-या साहित्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी
नसरापूर : दि. २१ सप्टेंबर (रविवार) उद्यापासुन नवरात्र उत्सवाला सुरूवात असल्याने भोर तालुक्यातील नसरापूर बाजारात घटस्थपनेसठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती, देवी आईचा जागर करण्यासाठी लागणा-या पूजेच्या साहित्यानी बाजारपेठ सजली होती, साहित्यांची खरेदी करण्यासाठी भक्तगणांची बाजारात लगबग सुरु होती. घटस्थापनेसाठी लागणारे सर्वच साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे.
दुर्गा माता देवीच्या आगमनाची तयारी, गरब्याची धूम अशा अनेक गोष्टींची तयारी जोरदार झाली आहे. नवरात्रीनिमित्ताने दुर्गा मातेचे घरोघरी घटस्थापना उत्साहात होणार आहे. त्यासाठी घट बसविण्यासाठी मातीसह पुजेच्या साहित्याची गरज लागते. ही गरज लक्षात घेऊन ग्राहक किरकोळ बाजारात काही व्यापा-यांनी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. त्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बाजारात सध्या १० रुपयात लोटकं भर माती, पुजेचे साहित्य ३० ते ४० रूपयांत विकली जात असून नागरीक मोठ्या उत्साहात साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
घटासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी भक्तगणांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. घटाला लागणा-या साहित्य, फळे, फुले, केळीची पाने, सुपारी, हळद कुंकू, कडधान्य त्याच बरोबर घटस्थापनेसाठी मातीचे घट आणि माती लागते. काही नागरीक इकडे-तिकडे माती शोधत फिरण्यापेक्षा बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने माती खरेदीला पसंती देत आहेत. यातूनच विक्रेत्यांना देखील रोजगार उपलब्ध होत असून, एक ग्राहक कमीत कमी तीन ते चार ग्लास माती विकत घेऊन जात असून त्याबरोबर पुजेचे साहित्यही खरेदी करीत असल्याची माहिती किरकोळ विक्रेत्या श्रीमती झामाबाई खोपडे यांनी दिली.
यंदाचा गणेशोत्सव विनानिर्बंध साजरा करण्यात आला होता त्याच धर्तीवरही आता नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. बाजारात फुले, फळे, हळद, कुंकू आदी साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. तसेच, नवरात्रोत्सवात नऊ रंगांच्या साड्यांची खरेदी करतानाही महिला भगिनी दिसत आहेत.
नवरात्रोत्सवात झेंडू व अन्य फुलांची खरेदी करण्यात येते. यंदा बाजारात फुलांचे दरही वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार असल्याचे दिसत आहे. तसेच सोनाराकडून देवीचे सोने-चांदीच्या अलंकाराची स्वच्छता केली जात आहे.
दरवर्षी घरात नऊ दिवस कडक उपवास केला जातो. त्याची तयारी आठ दिवसांपासून करीत असून, बाजारातून घटस्थापनेला लागणारे छोटे मातीचे मडके त्याला लागणारे कापड, कडधान्य, पत्रावळी इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मात्र, पूर्वीपेक्षा दुप्पट भाव वाढलेले दिसत आहे.
सौ. लता चिकणे
गृहिणी, नसरापूर.
नवरात्रोत्सवात घटस्थापनेला लागणाऱ्या साहित्यात दुप्पट वाढ झाली आहे. मार्केट यार्डात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र, वाढत्या महागाईत सध्या सर्वच साहित्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. तरीही नवरात्रोत्सव असल्याने नागरिक खरेदी करीत आहेत.
श्री. मारुती लिमण (पारवडी)
विक्रेता, नसरापूर बाजार.




