आषाढी वारी निमित्त आळंदीतून लाखो भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान
राहुल गाडे आळंदी देवाची
आळंदी : दि.29/06/24 (शनिवार) आज सायंकाळी 6:00 वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी आळंदीत दाखल होतात, परिणामी आळंदी भाविकांनी गजबजुन जाते, आळंदीत दाखल होताच वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत असतात, मंदिरा मधील दर्शनबारीत वारकरी भाविक ‘ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेऊन वारकरी मंदिरामध्ये क्षणभर विसावुन हरीनामाचा गजर करताना दिसत होते. अनेकांनी महाद्वाराबाहेर राहून प्रस्थान सोहळा पाहण्याचा हेची देही,हेची डोळा आनंद घेतला. आळंदीत प्रस्थान काळात आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना देखील गैरसोयीस सामोरे जावे लागु नये यासाठी योग्य नियोजन केले गेले होते, आळंदी देवस्थानाकडुन बाकीच्या भाविकांनसाठी प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली होती.
या पालखी प्रस्थान सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे,रमेश कोंडे महादजी शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त अँड राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, विश्वस्त भावार्थ देखणे, आळदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी भीमा नरके, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, मानकरी योगीराज कु-हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, योगेश आरु, अनिल कु-हाडे, फडकरी, दिंडीकरी, इत्यादी मानकरी उपस्थित होते.




