भोर नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू : उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस ठरला निरंक
भोर : दि. ११ नोव्हेंबर (मंगळवार) भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने हा दिवस निरंक ठरला आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे यांनी दिली.या निवडणुकीत दहा प्रभागांतून २० नगरसेवकांसह एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषद सभागृहातील निवडणूक कक्ष खुला राहणार आहे. अर्जांची तपासणी १८ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशनांची निश्चिती केली जाईल, तर अपील प्रक्रिया २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी केली आहे. नगरपरिषद हद्दीतील आठ इमारतींमध्ये एकूण २२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांवर २५० ते ३०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, देखरेखीकरिता आठ विशेष तपासणी पथके (व्हीएसटी, एफएसटी, एसएसटी आणि व्हीव्हीएसटी) कार्यरत राहतील.या निवडणुकीत एकूण १६ हजार ७१६ मतदार सहभागी होणार आहेत. नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी उत्साहाने मतदान करावे, तसेच निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
कायदोव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावला गेला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांचा प्रतिसाद आणि उमेदवारांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भोर नगरपरिषद निवडणूक स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्वाची मानली जात असून, विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी आखलेले रणनीतीचे डाव हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. पहिल्या दिवशी अर्ज निरंक राहिल्याने राजकीय रसिकांचे कुतूहल अधिकच वाढले आहे.




