जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले ! आचारसंहिता आजपासून लागु
मुंबई : दि. १३ (मंगळवार) राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
आजपासून या जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली असून, मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घेतले जाईल. निकाल ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून जाहीर होईल.निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन अर्ज भरणे १६ ते २१ जानेवारी, छानणी २२ जानेवारीला, उमेदवारी माघार २७ जानेवारीला (अंतिम मुदत) होईल. चिन्हवाटप व उमेदवारांची यादी त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर जाहीर होईल.
५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्ह्यांच्या निवडणुका नंतर घेतल्या जातील.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तयारीचे आदेश दिले असून, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यास सांगितले आहे. या जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षणामुळे पहिल्या टप्प्यात समावेश झाला आहे.
निवडणुक जाहिर झाल्यामुळे राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, आपापल्या पक्षाकडे उमेदवारांची उमेदवारी पक्की करण्याकरिता सुरुवात झाली आहे.




