राजकीय

आपटी गावच्या अश्विनी गायकवाड यांची पंचायत समिती शिंद गणातून उमेदवारीची मागणी


 

भोर : दि. २८ ऑक्टोबर भोर तालुक्यातील आपटी येथील समाजसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या सौ. अश्विनी अविनाश गायकवाड यांनी पंचायत समिती शिंद गणातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या आपटी बूथ प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून प्रभावी जनसंपर्काचे जाळे निर्माण केले आहे.

अश्विनी गायकवाड या शिक्षणाने पदवीधर असून स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण, तसेच सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. हळदीकुंकू कार्यक्रम, महिला बचतगट विस्तार, तसेच ग्रामविकासात महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.

त्यांचे पती अविनाश संपत गायकवाड हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून भोर तालुका युवक उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर सध्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्षपद ते भूषवत आहेत. ते प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवडे येथील रुग्ण कल्याण समितीचे 2017 पासून सदस्य असून ग्रामआरोग्य आणि वैद्यकीय सेवांच्या उन्नतीसाठी त्यांनी योगदान दिले आहे.

Advertisement

आपटी माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उभारून त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच ग्रामपंचायत आपटीचे प्रभारी सरपंच म्हणून त्यांनी गावात विविध विकासकामे राबविली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रभात वृत्तपत्र समूहाच्यावतीने त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भोर तालुका पातळीवर त्यांनी विविध थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, आरोग्य शिबिरे, एस.टी. बससेवा आणि महावितरणच्या सेवा सुधारण्यासाठीही लक्षणीय प्रयत्न केले आहेत. याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे.आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याच्या जोरावर सौ. अश्विनी गायकवाड यांनी पक्षाकडे पंचायत समिती शिंद गणातून उमेदवारी मिळण्याची प्रबळ मागणी केली आहे.

त्यांच्या सक्रिय कार्यक्षमतेमुळे स्थानिक पातळीवर त्यांना मोठा जनाधार आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!