समाजसेवेतून राजकारणाकडे प्रवास ! मोनिका दशरथ जाधवांची कामथडी पंचायत समितीच्या रिंगणात दमदार एन्ट्री
संगमनेर : भोर तालुक्यातील कामथडी गणातून आगामी पंचायत समिती निवडणुक लढण्याची उमेदवारी जाहीर करताना सामाजिक कार्यात नावलौकिक मिळवलेल्या मोनिका दशरथ जाधव या शिवसेना तालुका प्रमुख दशरथ जाधव यांच्या पत्नी असुन त्यानी “ईश्वर सेवेकडून मानव सेवेकडे” या ब्रीदवाक्याशी निष्ठा व्यक्त केली. स्वर्गीय शाहीर दादा कोंडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा व जनहिताची कामे करत असलेल्या जाधव दांपत्याने आपल्या कार्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
मोनिका जाधव यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रभावी नियोजन आणि स्थिर नेतृत्व गरजेचे आहे. भोर तालुक्यातील धरण क्षेत्र तसेच डोंगरी व दुर्गम भागातील कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी त्या कटिबद्ध आहेत. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांच्या स्वावलंबनासाठी उपक्रम राबविणे आणि शिक्षणासोबत आरोग्यसुविधांचा दर्जा उंचावणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
माझे पती व मी समाजसेवेच्या माध्यमातून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. विकासकामांचा प्रत्येक नागरिकाला थेट लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे असे त्या म्हणाल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कामथडी गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणुकीला उतरण्याची अधिकृत घोषणा करताना त्या म्हणाल्या की माझ्या सामाजिक व राजकीय कार्याची जनतेने दखल घेतली आहे. आता तुमच्या मतदानरूपी आशीर्वादाने पुढील विकासाचा नवा अध्याय उघडू या.
मोनिका दशरथ जाधव यांच्या या घोषणेमुळे कामथडी परिसरात उत्सुकता निर्माण झाली असून, सेवाभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नागरिकांकडून मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.




