कामथडी–भोंगवली गटात भाजपकडून रोहन बाठे यांच्या उमेदवारीचे संकेत ! समर्थकांमध्ये उत्साहाचा माहोल
सारोळा : भोर तालुक्यातील कामथडी–भोंगवली गटातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाकडून भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, बाठे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत असून या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे.
रोहन बाठे हे गेली अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा मानला जातो. कार्यकाळात त्यांनी विकासकामांना प्राधान्य देत गावागावात विविध योजनांचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवले. घरकुल योजनेची प्रभावी अमलबजावणी, युवकांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम तसेच सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यामुळे गटातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना काळात त्यांनी गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. त्यांच्या अमृता उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार व उद्योजकतेची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या कार्यशैलीत सर्वसमावेशकता आणि विकासदृष्टी असल्याने ते कामथडी–भोंगवली गटातील सर्व घटकांना आपले वाटतात.
सध्या भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर या चर्चेचे सावट असून बाठे यांच्या समर्थकांनी उमेदवारीचे संकेत मिळाल्याने जल्लोष सुरू केला आहे. युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत मोठा प्रतिसाद मिळत असून प्रचाराची तयारीही सुरू झाली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्यामुळे हा गट भाजपसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.




