श्री क्षेत्र बनेश्वर येथे झाडावरील मधमाशांचे पोळे काढताना खाली पडुन तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
नसरापूर : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराबाहेरील वनविभागाच्या हद्दीतील झाडावरील मधमाशांचे पोळे काढताना विष्णू मारुती पवार (वय २५) हे झाडावरून पडून मृत्युमुखी पडले. ही घटना बुधवारी (१८ मार्च) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. सुरक्षा उपकरणांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा आरोप आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी केला असून, संबंधितांनी हात वर केल्याचा त्यांचा दावा आहे.
पोळे काढण्यासाठी उपस्थित असलेल्या साथीदारांनी विष्णूंना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर ससून रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य सचिव गणपत काटेकर यांनी घटनास्थळी पाहणी करून मयताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
वनविभागाने बनेश्वर देवस्थान ट्रस्टने हे काम केल्याचे सांगितले, तर ट्रस्टने आरोप फेटाळले. वनविभागाचे झाड असल्याने पोळे काढणे त्यांची जबाबदारी असते, असे कार्यकर्ते सांगतात. गेल्या काही दिवसांत मधमाश्यांचे नागरिकांवर हल्ले वाढले होते. ट्रस्टने वनविभागाकडे निवेदन दिले होते, मात्र अनुभवी कर्मचारी नसल्याचे कारण सांगून जबाबदारी ट्रस्टवर ढकलली. अग्निशमन दल किंवा तज्ज्ञांची मदत न घेता आदिवासींना पाचारण केल्याने ही दुर्घटना घडली, असा आरोप आहे. नेमके जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला असून, चौकशीची मागणी होत आहे.




