आळंदीमध्ये जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विजय भोसले,
आळंदी.
पुणे : आळंदी मधील ४५० एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारणार असुन या ज्ञानपीठाच्या माध्यमातून प्राचीन भागवत धर्मातील कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार,आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
महाराष्ट्राला आणि देशाला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य वर्षानुवर्ष संत करत आले आहे. वारकरी हे प्रत्येकात पांडुरंग पाहत असतात, वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे, संत परंपरेमुळे त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकी शिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे हे ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयाचा आराखडा तयार केला असून ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात पोहोचवता येतील, तसेच इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्गयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




