भोंगवली सबस्टेशनविरोधात हजारो ग्रामस्थांची अभूतपूर्व एकजूट ! ‘अदानी हटवा, भोंगवली वाचवा’ च्या घोषणा !! सत्तेपेक्षा जनशक्तीचा आवाज बुलंद !!! प्रकल्पाविरोधात मानवी साखळीने प्रशासनाचे लक्ष वेधले
भोंगवली : भोर-राजगड तालुक्याचे अस्तित्व, शेती, पाणी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भोंगवली येथे प्रस्तावित अदानी उच्चदाब वीज उपकेंद्र (सबस्टेशन) आणि टॉवर लाईन प्रकल्पाविरोधात रविवारी (दि. २२) हजारो ग्रामस्थांनी एकजुटीने जोरदार एल्गार पुकारला. ‘अदानी हटवा, भोंगवली वाचवा’, ‘भोर-राजगड वाचवा, शेती, पाणी आणि भविष्य वाचवा’ अशा बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रकल्पाच्या जागेभोवती मानवी साखळी करून सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भर उन्हात आंदोलन करण्यात आले.
या प्रकल्पाच्या नावाखाली परिसरातील असंख्य झाडांची कत्तल, अवैध उत्खनन, जमिनींची विक्री आणि शासकीय बंधारा बुजविण्यात आल्याचे गंभीर आरोप आंदोलकांनी केले.
शेतीसाठी जागा खरेदीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आला. हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या हितापेक्षा धनदांडग्यांच्या फायद्यासाठी राबविला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रकल्पामुळे शेती, जलस्रोत, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्य उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. भोरमधील ७१ आणि राजगडमधील ४५ अशा एकूण ११६ गावांच्या भवितव्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.
यावेळी आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार संग्राम थोपटे, पी. डी. बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, पंचायत समिती उपसभापती विशाल कोंडे, माजी उपसभापती रोहन बाठे, माजी उपसभापती अमोल पांगारे, काँग्रेस नेते सतीश चव्हाण यांच्यासह महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.




