विराट हिंदू संमेलन ! सनातन धर्म, संस्कृती व हिंदु समाज रक्षण !! कुटुंबापासून राष्ट्रकार्यापर्यंत एकतेचा संकल्प
कापूरव्होळ : सनातन हिंदू धर्म, समृद्ध हिंदू संस्कृती आणि अखंड हिंदू समाजाचे संरक्षण करण्याचा दृढ संकल्प घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील कापूरव्होळ येथे विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समस्यांचे निराकरण, नागरी कर्तव्यांचे पालन आणि स्वबोध जागृती या ‘पंच परिवर्तनाच्या’ राष्ट्रकार्यांत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि मातृशक्तींनी सहकुटुंब मोठया संख्येने उपस्थिती लावली.
या संमेलनाने हिंदू समाजाच्या एकतेला बळकटी मिळाली असून, स्थानिक तरुणांना हिंदुत्वाच्या ध्येयासाठी प्रेरणा मिळाली.
संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून शिवचरित्र, शंभुचरित्र व्याख्याते, लेखक, दिग्दर्शक व प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते निलेश भिसे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सनातन धर्माच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीने कुटुंबापासून राष्ट्रकार्यापर्यंत योगदान द्यावे, असे ठाम आवाहन केले.
मातृशक्ती प्रबोधन विषयावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यकारणी सदस्य व लेखिका सौ.अपर्णा नागेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना मातृशक्तींच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण वसंत दबडघाव उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कापूरहोळ गावचे युवा उद्योजक रविंद्र गाडे हे होते.
निमंत्रक म्हणून वीर धाराऊ माता तरुण मंडळ कापूरव्होळ, देऊळजाई मित्र मंडळ दिवळे, जय हनुमान तरुण मंडळ हरिश्चंद्री, भैरवनाथ तरुण मित्र मंडळ कुंभोशी, ग्रामस्थ मंडळ कामथडी (हिंदुस्तान क्रिडा मंडळ), भैरवनाथ तरुण मंडळ उंबरे, ग्रामस्थ मंडळ खडकी, श्रीनाथ तरुण मंडळ देवडी व शिवशक्ती मित्र मंडळ केतकावळे या संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
हिंदु संमेलनात सहभागी ग्रामस्थांनी हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करून राष्ट्रकार्याची जबाबदारी स्वीकारली.प्रमुख वक्त्यांनी पर्यावरण संरक्षण, सामाजिक समस्यांवर उपाययोजना आणि स्वबोध जागृतीची गरज सांगितली.
या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आकर्षण ठरले चेतन गाडे यांची दोन मुले दुर्वांकुर व रुद्र या भावांनी म्हटलेले राम रक्षा स्तोत्र.
तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यातून छोटसं नाटक सौ. सोनाली गाडे यांनी मुलांच्या सहभागातून पूर्ण केले.
संस्कार वर्गातील मुलांना मनाचे श्लोक, गणपती स्त्रोत शिक्षका सौ.सरिता गाडे, सौ.मनीषा गाडे, सौ. पोर्णिमा गाडे, सौ. ज्योशना
गाडे यांनी करून घेतले.
या मेळाव्याला हिंदुत्वाचे वातावरण तयार करण्याचे काम जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी यांनी केले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन सोमनाथ कुलकर्णी, सौ.सोनाली गाडे, कु. सई गाडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केतकावळे-कुंभशी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शांताराम बाठे यांनी केले.
या मेळाव्यासाठी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री.खंडोबारायांची पगडी जेजुरी देवस्थानच्या सहकार्याने दर्शनासाठी उपलब्ध असल्यामुळे सर्व हिंदू बांधवांना दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.
अध्यक्ष रविंद्र गाडे म्हणाले, या संकल्पाने भारत माता विश्वगुरू म्हणून उदयास येईल. प्रत्येकाने कुटुंब प्रबोधनापासून सुरू करून राष्ट्रकार्यात हातभार लावावा.” संमेलन सौहार्दपूर्ण वातावरणात संपले असून, यापुढील कार्यक्रमांसाठी उत्साह निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हिंदुत्व जागरणाला वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.




