राजकीय

भोर नगरपालिका निवडणुक ! राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात


भोर : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे भोरमध्ये नारळ फोडून प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप आणि विरोधी गटांवर जोरदार टीका करत पक्षाच्या धोरणांची माहिती दिली.

आमदार शंकर मांडेकर म्हणाले, “आमचे उमेदवार सर्वसामान्य वर्गातील असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सावट नाही. आमच्या पॅनेलमध्ये ना मटका व्यवसाय करणारे, ना क्लब चालविणारे, ना पाणी किंवा वीज चोरी करणारे उमेदवार आहेत. भोरकरांना प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्वाची गरज आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरवेल.

ते पुढे म्हणाले की सत्तेत आल्यानंतर भोरवासीयांना 24 तास पाणीपुरवठा हा आमचा पहिला निर्णय असेल. सध्या भोरमध्ये जी भाजप कार्यरत दिसते ती थोपटे भाजप आहे. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून श्रमिक वर्गाला दुय्यम वागणूक दिली जात आहे.

Advertisement

मांडेकर यांनी भाजपवर सामाजिक समतोल बिघडवल्याचा आरोप करत म्हटले, उमेदवारांच्या यादीत मुस्लिम आणि दलित बांधवांना कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. केवळ विशिष्ट गटातील उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याने भोरसारख्या एकात्मिक शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.

माजी आमदारांविषयी बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष हल्ला चढवला व म्हटले, सत्ता गमावल्यानंतर काहींना वास्तव सहन होत नाही. काही महिन्यांतच त्यांनी पक्षांतर करून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आजही त्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर असंतोष दिसतो.

या प्रचार सभेला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घोषणाबाजी, उमेदवारांच्या उपस्थिती आणि जनतेच्या उत्साहामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचा रंग चढला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!